करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून, नगर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप दररोज ४ तासच सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ३१ मार्चपर्यंत पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेतच पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संचारबंदी लागू करण्यात आली असून, नगरमधील रस्त्यांवर खासगी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक खासगी वाहने रस्त्यांवर विनाकारण दिसत आहेत. अशा वाहनचालकांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई सुद्धा सुरू केली आहे. तसेच आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप हे ३१ मार्चपर्यंत दररोज केवळ ४ तासच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
नगर जिल्ह्यात पेट्रोल पंप ४ तासच सुरू राहणार