देशातील 'या' राज्यांतही साजरा होतो गुढीपाडवा

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच चैत्र प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रास सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही गुढीपाडवा साजरा केला जाते. किंबहुना इतर राज्यातही याच दिवसापासून नववर्षारंभ होतो. चाल तर मग जाणून घेऊया देशभरातील राज्यांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या नववर्षारंभांविषयी.


भारतात सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर वापरले जाते. याशिवाय भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, भारतीय राष्ट्रीय पंचांग नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी भारत सरकारने भारतीय राष्ट्रीय पंचांग वापरण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात जनतेची साथ न मिळाल्याने हे कॅलेंडर आता सरकारी पत्रांवर किंवा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तिथींच्या जोडीने लिहिण्यापलीकडे वापरले जात नाही. आकाशवाणीवर या तारखांची उद्घोषणा केली जाते.