राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला असून अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोघे परदेशी नागरिक असून दिल्लीतील 'मरकज'मध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.
नगरच्या आरोग्य विभागानं काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५१ रुग्णांचे अहवाल मिळाले असून सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, तब्बल ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या सहा करोना रुग्णांपैकी दोघे परदेशी असून एक इंडोनेशिया व दुसरा जिबुटीचा नागरिक आहे. या दोघांच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली आहे. त्यापैकी दोघे मुकुंदनगर येथील तर दोघे संगमनेर येथील आहेत. मुकुंदनगर येथे आढळलेल्या दोन बाधित व्यक्ती या परदेशी व्यक्तींच्या भाषांतरकार म्हणून काम करीत असल्याची माहिती असून त्या मूळच्या भोपाळ व राजस्थानच्या आहेत. अशा स्थानिक असणाऱ्या चार नागरिकांचा अहवाल सुद्धा ‘करोना पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १४ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.