जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवरून केल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून ग्राहकांना आता डबल झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानमध्ये ६० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा एक रिपोर्ट समोर आला असून या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. टेलिकॉम कंपन्यांनी डेटाच्या किंमतीत ५ टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हाईस कॉलसाठी एक निश्चित दर ठरवण्याची मागणी केली आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी केलेली मागणी जर ट्रायने मान्य केली तर काही दिवसात युजर्संना रिचार्जसाठी ६० ते ८० टक्के रक्कम जास्तीची मोजावी लागणार आहे. जिओकडून मोबाइल डेटासाठी २० रुपये प्रति जीबी डेटा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर व्होडाफोनने एका जीबीसाठी ३५ रुपये किंमत करण्याची मागणी केली आहे. सध्या डेटा टॅरिफचे दर हे एका जीबीसाठी ४ रुपये आहे. जर ट्रायने टेलिकॉम कंपन्याची मागणी मान्य केली तर पोस्टपेड आणि प्रीपेड युजर्संना एका जीबीसाठी किंवा १.५ जीबीसाठी जवळपास ६० ते ८० टक्के जास्त रक्कम द्यावी लागेल.