विश्वचषक जिंकल्यावर काय घडलं, वाचा...

भारताने आजच्याच दिवशी २०११ साली विश्वचषक जिंकला होता. भारताने हा विश्वचषक कसा जिंकला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण हा विश्वचषक जिंकल्यावर नेमकं काय घडलं, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.

भारताने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा पेव्हेलियनमध्ये सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा होत्या त्या भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर. कारण २१ वर्षे देशाची सेवा केल्यावर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच ही गोष्ट आली होती. खेळाडूंना भेटल्यावर सचिन पत्नी अंजलीला भेटला. अंजलीला त्याने मिठी मारत आपला आनंद साजरा केला. त्यानंतर तो मैदानात उतरला. सर्व खेळाडू सचिनची वाट पाहत होते. त्यावेळी काही खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर घेत वानखेडे स्टेडियमला एक फेरी मारली. सर्व सेलिब्रेशन करून सचिन जेव्हा पेव्हेलियनमध्ये आला तेव्हा त्याला आपला चाहता असलेल्या सुधीरची आठवण झाली. प्रत्येक सामन्यात अंगावर तिरंग्याचा रंग लावून हा सुधीर संघाला प्रोत्साहन देत होता. सचिन पेव्हेलियनमधून बाहेर आला आणि सुधीरला हाक मारली. स्टेडियममध्ये भरपूर आवाज होता. तरी सुधीरला आपल्या देवाची हाक ऐकायला आली आणि तो पेव्हेलियनमध्ये गेला. त्यावेळी विश्वचषक हा वेगवान गोलंदाज झहीर खानच्या हातामध्ये होता. सचिनने तो विश्वचषक सुधीरला द्यायला सांगितला. सुधीरने तो विश्वचषक हातात घेतला आणि जोरदार आरोळी ठोकली. त्यावेळी भारतीय खेळाडूही सुधीरबरोबर सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.